आरोग्य कवच प्रत्येक घरापर्यंत; 31 ऑगस्टपूर्वी आयुष्यमान कार्ड घ्या

नाशिक : जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली मोहीम ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आयुष्मान कार्ड वितरणाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील एकूण कुटुंबसंख्या १४.५ लाख असून लाभार्थी संख्या तब्बल ६१ लाख ६८ हजार आहे. मात्र अद्याप फक्त १७ लाख ६८ हजार कार्डच वितरीत झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबापासून सुरुवात करून मोहिमेत जनजागृती करावी. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस व आरोग्य कर्मचारी यांच्या पथकांमार्फत घरभेटी घेऊन नोंदणी करावी. मुदतबाह्य शिधापत्रिकांचे नुतनीकरण करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे,असेही ते म्हणाले.

विशेष शिबिरे
नागरिकांपर्यंत या मोहिमेची माहिती पोहचविण्यासाठी विशेष प्रचार-प्रसार मोहीम हाती घेण्यात यावी. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना आयुष्मान कार्ड नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ रामकुमार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, जिल्हा प्रमुख डॉ. राहुल जोगवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जगदीप पवार उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

error: Content is protected !!