नाशिक । अंगणवाडी म्हटलं की कुठे झाडाखाली मिळेल त्या जागी भरणार्या अंगवाडया, तर कुठे पडक्या इमारतीत धडे गिरवणारी उद्याच्या भारताची भावी पिढी तर कुठे गळक्या अंगणवाडया असे चित्र आपल्या समोर येईल. परंतू नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या अंगणवाडयांकडे तेथील समस्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केले अन आज राज्यातील पहिली ‘थ्री डी’ अंगणवाडी नाशिकमध्ये साकारत आहे. त्याची घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक येथे केली.
ही अंगणवाडी टेक्नॉलॉजी-आधारित आणि डिजिटल स्वरूपाची असेल, जिथे मुलांना आभासी, थ्री-डायमेंशनल (3D) माध्यमातून शिकवले जाणार आहे. विशेष म्हणजे या अंगणवाडीचे डिझाईन मुंबई आयआयटी च्या मदतीने करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हयातील येवला हे पैठणीसाठी प्रसिध्द आहे म्हणून या अंगणवाडीच्या इमातीचे डिझाईन पैठणीच्या नक्षीकामासारखे करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये चेहडी आणि वडाळीभोई येथे ही थ्री डी अंगणवाडी साकारण्यात येणार आहे.
थ्री डी अंगणवाडीचे फायदे
थ्री-डी अॅनिमेशन व स्मार्ट स्क्रीनद्वारे मुलांचे शिक्षण दृश्य आणि श्राव्य माध्यमातून होणार आहे, जे त्यांच्या आकलनशक्तीला चालना देईल. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करणारी पद्धत वापरली जाणार आहे. व्हिज्युअल प्रेझेंटेशनमुळे अक्षर, आकृती, रंग, आकार यांचे आकलन सोपे होईल. अभ्यासक्रम अधिक प्रभावी होईल. सृजनशील आणि खेळातून शिक्षण देणार्या प्रणालीमुळे मुलांना अंगणवाडीत यायला उत्साह वाटेल. डिजिटल डॅशबोर्ड, पालकांसाठी अपडेट्स, पोषण स्थितीची नोंद, आरोग्य तपासणी आदी गोष्टींमुळे पालक आणि अंगणवाडी यांच्यातील संवाद अधिक मजबूत होईल. लहान मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टमचा वापर होईल.

अंगणवाडयांचे विद्युतीकरण
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बालकांचा विकास आणि शिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील ३०३० अंगणवाडयांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे या अंगणवाडयामध्ये आता वीज उपलब्ध झाली आहे.तसेच वडांगळी येथे स्मार्ट अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे.
रोजगार व बाल विकास
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ११ हजार ९०० महिलांना लेक लाडकी योजनेचा लाभ देत पाच हजार रूपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. बालकांचे स्वास्थ्य चांगले राहावे याकरीता आरबीएसटीएस पोर्टलच्या माध्यमातून बालकांची नोंदणी करण्यात येउन त्यांना आरोग्य सेवा, नियमित तपासणी केली जाते. महिला बचत गटांनाही प्रोत्साहन देत स्वतंत्र बॅ्रंड तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला असून या महिलांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे आभार मानले.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या विकासासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अंगणवाडयांचे विद्युतीकरण, लेक लाडकी योजना, महिला बचत गटांना रोजगार निर्मिती, पिंक ई रिक्षा, बालकांना पोषण आहार असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यातील पहिली थ्री डी अंगणवाडी लवकरच नाशिकमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक









