नाशिक । पिंपळस ते येवला या ५६० कोटी रुपयांच्या तसेच लासलगाव ते खेडले झुंगे या १३४ कोटी रुपयांच्या चौपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना अधिक गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिल्या. नाशिक येथील कार्यालयात अधिकार्यांसमवेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पिंपळस ते येवला व लासलगाव ते खेडलेझुंगे रस्त्याच्या कामांना अधिक गती देऊन नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. पावसाळ्याच्या आत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यात यावे. कामाला अधिक गती देण्यासाठी कामगारांची तसेच मशिनरीची संख्या दुपटीने वाढवून कामास गती देण्यात यावी. तसेच या कामाला गती न मिळाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशा सूचना देखील अधिकार्यांना दिल्या. आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर हे काम कुठल्याही परिस्थितीत नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
लासलगाव खेडले झुंगे रस्त्याच्या कामाला खेडले परिसरात ज्या प्रमाणात गतीने काम सुरू आहे. त्याच गतीने लासलगाव विंचूर या बाजूने रस्त्याचे काम सुरू करून अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने हे काम प्राधान्याने घेऊन सुरू करण्यात यावे. या रस्त्याच्या अंतर्गत असलेल्या पुलांची कामे देखील जलद गतीने पूर्ण करण्यात यावी. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी देखील सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला देखील अधिक गती देऊन पुढील चार महिन्यात हे काम पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे. तसेच शेतकर्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.
यावेळी पिंपळस ते येवला या रस्त्यावरील १० किलोमीटर रस्त्याचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच खेडले ते लासलगाव रस्त्याचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिकार्यांनीदिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपअभियंता अविनाश देवरे, उपअभियंता प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, संकेत चौधरी, रेखा शेळके, मयूर मोहिते, कंत्राटदार अभय चौकसी, अनिल काळे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.










