गुड न्यूज ! लाडकी बहिणींसाठी शासनाची आता ही सुविधा

नाशिक । महाराष्ट्रात महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणूकांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आखली. आज राज्यात अडीच कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रूपयांचा लाभ दिला जातो. आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक नवी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज नाशिकमधून करण्यात आला.

महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजीत या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद नाशिकच्यावतीने महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित हाते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना विविध योजना तसेच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलतांना आदिती तटकरे म्हणाल्या, ‘लाडकी बहिण’ योजना ही महाराष्ट्राची एक आगळी-वेगळी योजना ठरली असून, अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र हे एकमेव राज्य यशस्वीपणे राबवत आहे. या योजनेला आर्थिक बळकटी देण्यासाठी काही बँकांसोबत करार करून महिलांना ‘रुपे कार्ड’ देण्यात येत आहे. हे कार्ड क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार असून, फक्त पान टपर्‍या आणि दारूच्या दुकानांत वापरावर बंदी असेल. रूपे कार्ड हे आता क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र सोबत शासनाने एक करार केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, केवळ योजनेचा लाभ दिला नसून त्यांना रोजगाराच्या संधीही या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने ‘पिंक रिक्षा’ योजना सुरू केली असून, उबर आणि ओला यांच्याशी करार करून विमानतळ परिसरात महिलांसाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे महिलांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महिलांना समान सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बाळाच्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला असून, हे करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. महिला आणि बालविकासाच्या क्षेत्रात नवकल्पना राबवत, नाशिक जिल्ह्यात राज्यातील पहिली थ्रीडी अंगणवाडी’ सुरू केली गेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘100 दिवसांचा कार्यक्रम’ राबवण्यात आला, त्यात महिला व बालविकास विभागाने पहिला क्रमांक मिळवला आहे. ही यशस्वी कामगिरी संपूर्ण यंत्रणेच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेचा प्रचार गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘आदिशक्ती समित्या’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ सुरू करण्याचा निर्णय चौंडी येथील बैठकीत घेण्यात आला आहे. गाव पातळीवर काम करणार्‍या महिलांना या पुरस्काराद्वारे गौरवले जाणार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत सक्रिय सहभाग घेणार्‍या महिलांना ५० रुपये प्रति फॉर्म याप्रमाणे प्रोत्साहन रक्कम (इनसेंटिव्ह) दिली जाणार आहे. यामुळे महिला प्रतिनिधींमध्ये उत्साहवर्धन होईल आणि योजनांचा प्रसार वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला व बाल कल्याण आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर आदींसह अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट उपस्थित होते.

error: Content is protected !!