नवी दिल्ली । नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.
17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज विज्ञान भवन येथे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागा मार्फत या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याने आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, उज्वला योजना, मुद्रा योजना, पोषण आहार योजना, स्वनिधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासह केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला.
केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात नाशिकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023 मध्ये करंडक, मानपत्र आणि 20 लाख रुपये प्रोत्साहन निधी असे पुरस्काराचे स्वरुप असून, हा निधी नाशिक जिल्ह्यातील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येईल.
सिव्हिल सर्व्हंट्स हेच बदलाचे वाहक – पंतप्रधान मोदी
नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल सर्व्हंट्सना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी सिव्हिल सेवेला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणत कार्यक्षमता, पारदर्शकता, आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जितेंद्र सिंग-केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, टी. व्ही. सोमनाथन-कॅबिनेट सचिव, व्ही. श्रीनिवास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (पहिले) शशिकांत दास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (दुसरे), वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सनदी अधिकारी उपस्थित होते.
शर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ ने सन्मानित झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. या वेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कोर अरोरा यांनी शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या आणि आदिवासीबहुल भागांचा समावेश असलेल्या नाशिक जिल्ह्याने पाण्याची टंचाई, भौगोलिक विस्तार आणि इतर स्थानिक अडचणींवर मात करत केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.
हा पुरस्कार नाशिकच्या जनतेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. सॅचूरेशन अप्रोचचा अवलंब करत आम्ही प्रत्येक योजनेला गती दिली व नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार आम्हाला यापुढेही अशी प्रेरणा देत राहील. नाशिक जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या योजनांत नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि प्रशासनाची अथक मेहनत आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला भविष्यातील कामासाठी अधिक ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल.
जलज शर्मा, नाशिक











