जिल्हा परिषद 1183 महिला कर्मचाऱ्यांनीच घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

नाशिक : राज्यातील महत्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेत पात्र नसतानाही अनेक लाभार्थींनी फायदा घेतल्याचे समोर येत असताना आता जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका घरात दोन लाभार्थी
सरकारने स्पष्ट नियम घालून दिले आहेत की एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, तपासणीत असे दिसून आले आहे की लाखो महिलांनी हा निकष मोडला आहे. महिला व बालकल्याण विभागाने तब्बल 26 लाख महिलांची चौकशीसाठी यादी तयार केली असून जिल्हानिहाय पडताळणी सुरू आहे.

कारवाईचे आदेश
महिला कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

लाखो लाभार्थी वगळणार ?
सध्या राज्यातील 2 कोटी 29 लाख महिला या योजनेत लाभार्थी आहेत. मात्र, पात्रतेच्या निकषांची पुन्हा छाननी झाल्यानंतर लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारीही आपोआप बाहेर पडणार आहेत.

योजना नेमकी कशी?
पात्र महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना दिले जातात.

पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये प्रतिमहिना दिले जातात.

यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक भार कमी होईल, पण आधीच लाभ घेत असलेल्या लाखो महिलांना फटका बसणार आहे.

error: Content is protected !!