वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत पण पैसे नाही ? काळजी करू नका आता येथे करा संपर्क

नाशिक | अनेकदा रुग्णांना दुर्धर आजारकरिता महागडे उपचार घ्यावे लागतात. परंतु या उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्ण उपचार घेऊ शकत नाही, अनेकजण तर सोन, नाणं गहाण ठेऊन उपचाराचा खर्च भागवतात. परंतु आता राज्य शासनाने या करता जिल्हास्तरावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू केले आहेत.

या कक्षातून दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने आतापर्यंत अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
यापूर्वी नातेवाईकांना अनेकदा अर्ज सादर करण्यासाठी मंत्रालयात हेलपाटे मारावे लागत यादरम्यान होणारा त्रास लक्षात घेऊन ही सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशांचा अपव्यय टळणार आहे.

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यलयात हा कक्ष सुरू करण्यात आला असून जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या कक्षाचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसिलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावेत तसेच नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे तसेच नागरिकाचा वेळ व पैसा यांची बचत होवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आतापर्यंत १३४ अर्ज दाखल
नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी २०२५ ते आजपावेतो जवळपास १३४ नागरिकांना वेगवेगळ्या अजारा संदर्भातील व रूग्णालय संदर्भातील योजनेबाबत माहिती व मदत घेतली असून त्यापैकी ३५ रूग्णांची नावे वैद्यकीय मदतीसाठी या कक्षामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी निगडीत दुर्धर आजारांवरील उपचारासाठी तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे करण्यात आलेली मदत
 मुख्यमंत्री सहाय्यता व इतर आरोग्य योजना अनुरूप मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- ९५
 कक्ष भेट व चौकशी निमित्त आलेले अभ्यागत संख्या- १३४
 आजपर्यंत प्रत्यक्ष दाखल प्रस्ताव संख्या- ३५
 दाखल प्रस्तावांपैकी मेल द्वारे मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- ९
 रूग्ण नातेवाईकांचे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबाबत मिळालेले अभिप्राय- १२

अशी होईल मदत
जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा’स प्राप्त अर्जांची सद्या:स्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास साहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच अर्थसाहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच उपचारांचा खर्च वाढत असल्यास अर्थसाहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे.

error: Content is protected !!