नाशिक । आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला विरोध वाढू लागला आहे. साधुग्रामासाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने सुमारे १७०० झाडे तोडण्याची, पुनरोपणाची किंवा छाटणी करण्याची सूचना प्रशासनाने दिल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या निर्णयावर अनेकांनी आवाज उठवला असून, आता ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या शनिवार, दि. २९ रोजी ते नाशिकमध्ये येऊन तपोवन येथे शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे यांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, एक झाडही सहजासहजी तोडू देणार नाही. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी जाऊ नये. लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही झाडे तोडावी लागतील, अशी भूमिका मांडली असली तरी पर्यावरणप्रेमींनी झाडांची पर्यायी व्यवस्था, शाश्वत नियोजन आणि पर्यावरणपूरक रचना करण्याची मागणी जोरदारपणे पुढे केली आहे.
आता अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आंदोलनानंतर प्रशासन या संवेदनशील मुद्द्यावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











