मंत्री छगन भुजबळ घेणार सिंहस्थ आढावा बैठक

नाशिक : मंत्री गिरीश महाजन यांनी दोनच दिवसांपूर्वी कुंभमेळा बैठक घेत आढावा घेतला त्यांनतर आता लागलीच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक बोलवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुंभमेळा बैठकीसह उद्योजकांची देखील भुजबळ बैठक घेणार आहेत.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरूवारी (दि.२१) ही बैठक बोलावली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही अशातच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर भुजबळांना गोंदिया येथे ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.मात्र भुजबळ ने गोंदिया येथे जाण्यास नकार दिल्याने शासनाने ही जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवली.मात्र यामुळं भुजबळांची नाराजी स्पष्ट झाली.

नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांने देखील दावा सांगितला आहे. नाशिकमध्ये भुजबळ यांच्यासारखे जेष्ठ नेते असताना भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे तर शिंदे गट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे.

जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाष्य करताना नाशिक जिल्ह्यात सात आमदार असताना आता आमदारांनी याकरता जोर लावण्याची आवश्यकता असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे.

भाजपने महाजन यांच्यावर कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. अशातच मंत्री भुजबळ यांनी गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ आढावा बैठक बोलावली आहे. त्यामुळे सिंहस्थ नियोजनात भुजबळ सक्रीय झाल्याचे संकेत मिळत आहेत. कुंभमेळासह उद्योजकांच्या अडचणी देखील भुजबळ जाणून घेणार आहेत.

जिल्ह्यात भुजबळ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

error: Content is protected !!