नाशिकमध्ये पुढील २४ तासांत कशी असेल पावसाची परिस्थिती ?

नाशिक । नाशिकमध्ये बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. नाशिकला सकाळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र दुपारनंतर हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील २४ तास नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू असून मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. नाशिकमध्येही दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत होता मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून आला. पावसाचा जोर कायम असल्याने पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने गंगापूरसह जिल्ह्यात १२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात असून दुपारी ३ वाजता ६३४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर दारणा धरणातून १८ हजार ४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत.

गोदाकाठी पथक सज्ज

गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असून गोदाकाठी नाशिक महापालिकेचे अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. सध्या श्रावण मास सुरू असल्याने बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. सकाळी भाविकांनी गोदाकाठ परिसरात वाहने उभी केली होती. पाणी पातळीत वाढ झाल्याने सहा ते सात वाहने पावसात अडकली होती. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने ही वाहने पाण्यातून बाहेर काढल्याने नुकसान टळले. गोदाकाठ परिसरात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी भरणारा आठवडे बाजारही बसण्यास यावेळी परवानगी नाकारण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात १ जूनपासून आजअखेर ७७.७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी आजअखेर ८७.४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. जिल्ह्यात २६ लहान मोठे धरण प्रकल्प असून यात काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, तिसगाव, भावली, भाम, हरणबारी, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणं १०० टक्के भरली आहेत. तर १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांना १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्टपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्रकिनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

जोर ओसरणार

२१ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जाते. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा उर्वरित भाग, कोकणपट्टी आणि खानदेशात २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान हवामान कोरडे राहील किंवा पावसाची पूर्ण उघडीप मिळेल तर २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस सुरू होईल, परंतु पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नाशिकमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २८ ऑगस्टनंतर पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा राहील.

धरण विसर्ग (क्यूसेकंमध्ये)

गंगापूर – ६३४०
दारणा – १४४९६
काश्यपी – २५९२
मुकणे – ९००
वालदेवी – ५९९
आळंदी – ६८७
होळकर पूल – ६२९८
भावी – २१५२
भाम – ५५९९
वाघाड – ७६७
तासंगाव – ३१
नांदूरमध्यमेश्वर – १२६२०
गौतमी गोदावरी – २३००

error: Content is protected !!