मुंबई । पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचे संरेखन सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करावी, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सादर केलेल्या नव्या संरेखन प्रस्तावात पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी मार्गाने ८० कि.मी. वळसा घालण्यात आला असून, तो तातडीने फेटाळावा, असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच भुजबळांनी यावर पर्याय देखील सूचवला आहे.
IMEEC (इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर) अंतर्गत वाढवण पोर्टसाठी थेट कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी पुणे-नाशिक मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या नव्या मार्गाने पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यातील माल आणि प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार असून, महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक धोरणाला बाधा पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या (NCRA-GMRT) आडमुठ्या भूमिकेमुळे संरेखन बदलण्यात आले असले तरी, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धर्तीवर GMRT परिसरात भूमिगत बोगदा बांधून पर्याय सुचवण्यात आला आहे. तरीदेखील GMRT कडून कोणताही ठोस प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.
रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प महारेल ऐवजी मध्य रेल्वे मार्फत राबवण्याचे संकेत दिल्याचेही भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे राज्य सरकारच्या ५०% आर्थिक सहभागासह सध्याचा नियोजनबद्ध आणि मर्यादित खर्चाचा आराखडा धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून GMRT परिसरात बोगदा बांधण्याची अट घालूनच प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करावा, हीच महाराष्ट्राच्या हिताची दिशा ठरेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.










