नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यांमध्ये रिंग रोड , रस्ते , हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे. नाशिक च्या बांधकाम व्यवसायिक यांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात क्रेडाई चे योगदान मोलाची असल्याचा सूर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी काढला. ते क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
या प्रसंगी आ. सीमा हिरे , आ.राहुल आहेर, क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा , एक्स्पो चे समन्वयक ऋषिकेश कोते , नरेंद्र कुलकर्णी, आय पी पी कुणाल पाटील , एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवंसरा , उपाध्यक्ष उदय घुगे, अंजन भलोडिया , अनिल आहेर व मुख्य प्रायोजक दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स चे संचालक दिपक चंदे हे मंचावर उपस्थित होते .ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शहराचा विकास हा पर्यावरण सांभाळून केला पाहिजे तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणे हे महत्वाचे असून आजमितीला देखील गोदावरी पत्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली .
आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक अध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेली शैक्षणिक आणि पर्यटन तसेच उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

या नंतर आपल्या मनोगतात क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की नाशिक ची वाटचाल ग्लोबल सिटी कडे होत असून अशा एक्स्पो मध्ये भविष्यातील नाशिक ची झलक मिळते . उद्योग ,पर्यटन , शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्री वर शासन ,प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला .
आपल्या स्वागत पर भाषणात समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी भविष्यातील नाशिकमधील संधींचा उहापोह केला त्या संधी अशा –
1)महिंद्राची नाशिकमधील गुंतवणूक
2) डिफेन्स हब म्हणून नाशिक मध्ये संधी
3) प्रस्तावित आयटी हब
4) दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात येणारे रिलायन्स लाईफ सायन्सेस सारखे मोठे उद्योग
5) मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क मुळे संधी
6) 36000 स्क्वे. मीटर वर पसरलेले इंडियन ऑईलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प
7) वाईन ,कृषी, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरण पूरक पर्यटनाच्या संधी
8) नाशिक मध्ये लवकर सुरू होणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
9) आगामी कुंभमेळ्यासाठी शासनातर्फे पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणार असलेली गुंतवणूक.
नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात नाशिक महत्वाच्या सर्व शहरांशी प्रभावीपणे जोडले जाणार असून त्यामुळे नाशिकमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपान प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते यांनी केले
प्रस्तावित दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे,पूर्णत्वास गेलेला समृद्धी महामार्ग प्रस्तावित चेन्नई -सुरत एक्सप्रेस वे, प्रस्तावित नाशिक -वाढवण बंदर रस्ता, लोकल द्वारे नाशिक- मुंबई जोडले जाणे यामुळे नाशिकचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना नाशिकमध्ये गुंतवणूकीची ही चांगली संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे असे आवाहन आवाहन आयोजकांनी केले.
प्रदर्शनाची वैशिष्ठे
वातानुकूलित डोम
प्रशस्त पार्किंग
विविध ऑफर्स
आकर्षक स्टॉल मध्ये ५०० हून अधिक पर्याय ..
एक्स्पो दरम्यान ग्रीन कुंभ 2025 या संकल्पने अंतर्गत विविध तज्ञांच्या विशेष चर्चासत्रांचे आयोजन











