नाशिक, इगतपुरी तालुक्यातील नागरीकांना खबरदारीच्या सूचना

नाशिक । पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आले. सध्या युध्दविराम जरी असला तरी, भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. भारतीय सैन्याकडून सध्या लष्करी तळांवर मोठया प्रमाणात सराव सुरू आहे. नाशिकमध्ये तोफखाना केंद्र असून या तोफखाना केंद्रात शेकडोंच्या संख्येनेन नवसैनिक शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत भारतीय सैन्यात दाखल होत असतात. ऑपरेशन सिंदूर नंतर तोफखाना केंद्रात हालचाली वाढल्या असून दिवसंरात्र सराव सुरू असतो. याच सरावाचा भाग म्हणून आता नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील नागरीकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय तोफखाना, देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील सी सेक्टर या ठिकाणी गुरूवार 23 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.

नाशिक व इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्‍हे, नांदूरवैद्य, दाढेगाव, शिगवे बहुला, वडनेर, पिंपळगाव खांब या गावांच्या मुलकी हद्दीतील काही भाग तोफांच्या मार्‍याच्या रेषेत येतो. हा विशिष्ट भाग कोणता आहे, याबाबत संबंधित गावांना दवंडीद्वारे सूचित करण्यात आले आहे.त्यामुळे गोळीबार प्रात्याक्षिकाच्या दिवशी व त्या वेळी धोक्याच्या हद्दीत नागरिकांना प्रवेश करण्यास व या भागात जानावरे पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!