नाशिक । गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला असून जिल्हयात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मे महिना हा तसा कडाक्याच्या उन्हाने भाजून काढतो परंतू यंदा तर मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणच पालटले. २५ मे पर्यंत जोरदार तर विदर्भातील ११ जिल्हयात या दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक जिल्हयात पावसाने मोठे नूकसान केले असून सोमवारी अवकाळी पावसाने वीज पडून एका इसमाचा मृत्यू झाला तर वडगाव पंगू येथे दोन हजार कोंबडया मृत झाल्या. सप्तश्रृंगी गडावर एका वाहनावर दरड कोसळल्याची घटना घडली.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अशा तीन समुद्रात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्ता दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून यातून होणारी चक्रीय वार्यांची स्थिती आणि उत्तरेकडे होणारया मार्गक्रमणामुळे वळवाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हयातही २३ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा हाहाकार सुरू असून रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मेघ गर्जनेसह झालेल्या पावसाने ग्रामीण भागात प्रचंड नुकसान केले. वडगाव पंगु येथे एका पोल्ट्रीफॉर्म जवळ वीज कोसळल्यामुळे दोन हजार कोंबड्यांच्या मृत्यू झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. पोल्ट्री फार्मला खेटून वीज पडल्यामुळे ही घटना घडली.
वीज पडून मृत्यू
निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील शेतकरी दिपक रंगनाथ रहाणे,वय 40 यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. जातेगांव येथील 12 वर्षीय आदित्य राजाराम वळवे यावर वीज पडल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्ह रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरड कोसळली
सप्तशृंगी देवी गड रस्त्यावर पाऊस सुरू असताना अचानक एक दगड वरून गाडीवर कोसळला .गाडीचे नुकसान झाले, कोणतीही जीवित हानी नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.









