पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिकांची घोषणा – अजित पवारांचा मोठा निर्णय

पुणे – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चाकण येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. लोकसंख्या पाच लाखांपर्यंत पोहोचली की महानगरपालिका स्थापन करणे अपरिहार्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चाकण परिसरातील वाहतूककोंडीची पहाटे पाहणी करताना अजित पवार स्वतः वाहतूक जाममध्ये अडकले. यावेळी त्यांनी थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर चाकणमध्ये नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी महानगरपालिका स्थापनेची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, महानगरपालिका झाल्याशिवाय केंद्र सरकार व जागतिक बँकेकडून निधी आणणे अशक्य होते. त्यामुळे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी महानगरपालिका हाच एकमेव मार्ग आहे.

या भागांना मिळणार महानगरपालिकेचा दर्जा
वाघोली, वाकवस्ती, लोणी काळभोर, फुरसुंगी, उरळी देवाची आणि दोन्ही मांजरी परिसर
पिंपरी-चिंचवडच्या पुढे नदीपल्याडचा परिसर
हिंजवडी आणि वरचा परिसर

वाहतूककोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार
चाकण परिसरातील तीव्र वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अजित पवारांनी सकाळी 5.45 वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढे पुणे-नाशिक एलिवेटेड कॉरिडॉर उभारण्याचाही विचार सुरु आहे.

नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
चाकण परिसरातील लोकांनी आजवर खूप सहन केले आहे. पण आता या प्रश्नातून सुटका देण्यासाठी सर्व उपाय केले जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!