नाशिक : नाशिक शहरातील विविध धार्मिक स्थळांवर अद्यापही नियमबाह्यपणे भोंगे वाजवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या वापराबाबत गंभीर लक्षवेधी सूचना मांडली होती. या मुद्द्यावर राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण राज्यभर धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करत मुंबई शहरात तब्बल ३३६७ भोंगे बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले. परंतु नाशिक शहरात आजही अनेक ठिकाणी भोंग्यांचा वापर सुरू असून हे परिपत्रक धाब्यावर बसवले जात आहे, अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
“चालू अधिवेशनातही भोंग्यांवरील कारवाई बाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मागणी केलेली होती आमदार देवयानी फरांदे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेऊन भोंग्यांवर कारवाई सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. मुंबई प्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात देखील भोंग्यांवर कारवाई होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करताना आजही अनेक भागात मोठ्यांनी भोगी सुरू असल्याचे स्पष्ट करताना भोंग्यांवर सक्त कारवाई करावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे आमदार फरांदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यांनी पोलीस आयुक्तांना पुढील गोष्टी करण्याची मागणी केली आहे:
नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे तात्काळ बंद करण्याचे आदेश देणे
पोलीस निरीक्षकांमार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगणे
संबंधित प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केलेली आहे









