नाशिक । राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शिलापूर येथे सीपीआरआय अर्थात नाशिक इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब साकारण्यात आली आहे. या लॅबचे बुधवार (दि. १० ) रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील औद्योगिक व इलेक्ट्रिकल क्षेत्राला कलाटणी मिळणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकलचे सुमारे साडेचारशेहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल पॅनेल्स आणि इतर वीज उपकरणांच्या निर्मितीनंतर टेस्टिंग करण्यासाठी सध्या भोपाळ व बंगळुरूला जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब स्थापन करण्याची नाशिकच्या उद्योजकांची मागणी होती. याबाबत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उद्योजकांना सदर लॅब स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली. शिलापूर येथे शंभर एकर जमिनीत हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
असा होईल फायदा
इलेक्ट्रिकल परीक्षण प्रयोगशाळेमुळे नाशिकसह राज्याच्या विविध भागातील इलेक्ट्रिकल उत्पादने तपासणीसाठी नाशिकला येतील. शहर परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना येथे संशोधन, अभ्यास करता येईल. तसेच या प्रयोगशाळेमुळे अन्य मोठे, मध्यम आणि लघु इलेक्ट्रॉनिक्स उद्योग नाशिकात येऊ शकणार आहेत. परिणामी, गुंतवणूक, रोजगार निर्मिती या दृष्टीनेही फायदेच फायदे आहेत.
लॅबचे नाशिकला फायदे:
सुधारित चाचणी सुविधा
नाशिकमध्येच होणार विद्युत उपकरणांची चाचणी
उत्पादनांची गुणवत्ता आणि मानके तपासता येतील
कार्यक्षमता वाढेल, गुणवत्तेची उत्पादने मिळतील
वेळेची आणि पैशांची बचत
नवीन तंत्रज्ञानाला चालना
रोजगार निर्मिती
उद्योग-अनुकूल वातावरण
असे आहेत प्रकल्पाचे टप्पे
जुलै २०१३ मध्ये सीपीआरआयच्या अधिकार्यांनी नाशिक येथे भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर २७ जुलै २०१३ रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सीपीआरआयचे महानिदेशक आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. शिलापूर येथील १०० एकर जागा नाममात्र दराने देण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी विलास पाटील आणि सीपीआरआयचे महानिदेशक यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आणला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने दि. १५ ऑगस्ट २०१३ रोजी शिलापूर ग्रामपंचायतीकडून ग. क्र. २२० ही जागा या प्रकल्पाला देण्यासाठी ठराव करून घेतला. त्यानंतर महिनाभरातच जागा हस्तांतरित करण्यात आली. ३१ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. सुमारे २१६ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार अधिक निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या माध्यमातून नाशिक केवळ धार्मिक-पर्यटन नगरी न राहता संशोधन, औद्योगिक आणि रोजगारनिर्मितीचे एक जागतिक केंद्र होईल. या प्रकल्पामुळे नाशिकच्या उद्योजकांना मोठा फायदा मिळणार असून रोजगाराची मोठी संधी देखील मिळणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील कंपन्यांना जागतिक स्तरावर दर्जेदार चाचण्या मिळतील. निर्यात वाढीस चालना मिळेल. स्थानिक पातळीवर हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- छगन भुजबळ, अन्न व पुरवठा मंत्री
देशविदेशांतील विद्युत उपकरणे वापरासाठी चाचणी परीक्षण आवश्यक असते, त्याची सुविधा स्थानिक ठिकाणी होणार असल्याने नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय विद्युत बाजारपेठेच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील लहान व मोठ्या विद्युत उपकरणांचे उत्पादन करणार्या कारखान्यांचे विस्तारीकरण येथे होण्यास मदत होईल. तसेच इटली, कॅनडा, ब्राझील, इराण, हॉलंड अशा अनेक देशांच्या चाचणी सुविधादेखील सीपीआरआयप्रमाणेच असल्याने स्थानिक उद्योगांना थेट उत्पादनांचा पुरवठा या देशात करणे शक्य होणार आहे.
- समीर भुजबळ, माजी खासदार











