नाशिक – देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरला नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाशी जोडण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भरवीर ते तवा दरम्यान १०४ किलोमीटरच्या फ्रेड कॉरिडॉरला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना वाढवणसाठी भरवीरचा पर्याय सर्वोत्तम ठरणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
सध्या देशात असलेल्या बंदरांमध्ये वाढवण बंदराची क्षमता सर्वाधिक असणार आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत शीघ्रगतीने व किफायतशीरपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र समृध्दी महामार्गाशी जोडणे आवश्यक आहे. यासाठी समृध्दी महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील भरवीर इंटरचेंज असा फ्रेड कॉरिडॉर महामार्ग प्रस्तावित आहे.
समृध्दी महामार्गाने जोडलेल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहिल्यानगर, ठाणे या दहा जिल्ह्यांमधील मालवाहतुकीसाठी भरवीरचा पर्याय सर्वोत्तम ठरणार आहे. याशिवाय गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, परभणी, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमधील मालवाहतुकीसाठी देखील व्हाया भरवीर वाढवण गाठणे सोयीचे ठरणार आहे. पुणे जिल्ह्यांतील निर्यातक्षम मालवाहतुकीसुद्धा सिन्नरमार्गे भरवीर गाठणे सोयीचे ठरणार आहे.
पाच तासांचा प्रवास दिड तासांवर
भरवीर ते तवा जंक्शन १०४ किलोमीटरच्या या मार्गासाठी सुमारे १ हजार हेक्टर जमीनीचे संपादन केले जाणार असून यासाठी सुमारे दिड हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. भरवीर ते तवा अंतर सध्याचे १८३.४८ किमी असून हा महामार्ग तयार झाल्यास अंतर ७८ किलोमीटरने कमी होऊन १०४ किलोमीटरवर येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाच तास लागतात, तर या महामार्गामुळे हे अंतर अवघ्या दिड तासात पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी १४,८९९.७२ कोटी रुपये खर्च येणार आहे.
या निर्णयामुळे नाशिक जिल्हा, मराठवाडा, विदर्भ व इतर अंतर्गत भागातील औद्योगिक व शेती उत्पादनांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी अधिक सुलभ व किफायतशीर होईल. वाढवण बंदर भारतातील सर्वात खोल आणि आधुनिक सागरी टर्मिनलपैकी एक असणार असून, IMEEC व INSTC सारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारमार्गांशी थेट जोडले जाणार आहे. या सर्वाचा थेट फायदा महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासाला होणार आहे.
छगन भुजबळ, मंत्री अन्न व पुरवठा











