भाजपात खांदे पालट : सिडको मंडळ अध्यक्षपदी डॉ. वैभव महाले

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नवीन नाशिक (सिडको) मंडळ अध्यक्षपदी डॉ. वैभव महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार सीमा हिरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या डॉ. महाले यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

मावळते अध्यक्ष अविनाश पाटील यांना आता शहर कार्यकारिणीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत करण्यात मोठे योगदान राहिले असून, त्यांनी भाजप नेते सुनील केदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांशी मजबूत संबंध टिकवले.

नवीन अध्यक्षपदी नियुक्तीनंतर डॉ. वैभव महाले यांना कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. महाले यांचा समाजाशी आणि मित्र परिवाराशी असलेला दांडगा जनसंपर्क, सामाजिक चळवळीतील सक्रीय सहभाग ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे.

आगामी महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वात पार पडणार असल्याने, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसह निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपले आहे. त्यांच्या कार्यशैलीतून पक्षाला आणि कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नव्या जबाबदारीत डॉ. महाले किती न्याय देतात, आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षाला कोणते नवे मापदंड गाठता येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!