नाशिक । नाशिकच्या राजकारणात मोठया हालचाली बघायला मिळत आहे.शिवसेनेतून हकालपटटी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच आता माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यासोबतच नाशिकमधील काही दिग्गज नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे नाशकात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
आगामी महापालिका निवडणूकीसाठी भाजपनेे शंभर प्लसचे उदिदष्ट ठेवले आहे. याकरीता आता इतर पक्षातून तूल्यबळ उमेदवारांना भाजपात घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रवेश सोहळयाकडे पाहिले जात आहे. भाजपकडून नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का देण्याची रणनिती आखण्यात आल्याचे समोर येते.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत होती. आता ती चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून मंगळवार (दि. १७) रोजी मुंबईत बडगुजर आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला जोर चढला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत नाराजी जाहीरपणे व्यक्त करताच पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. बडगुजर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून त्यांनी विभागप्रमुख, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख ते उपनेते अशी अनेक पदे भूषवली आहेत.
बडगुजर यांनी दोन वेळा आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली असल्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार हिरे यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बडगुजर यांच्याविरोधातील आरोपांची माहिती दिली आणि त्यांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपमधील काही नेते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी आग्रही असल्याचे समजते.
या सगळ्या हालचालींमध्ये बडगुजर आणि त्यांच्या समर्थकांच्या समेटाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ’शंभर प्लस’चे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मजबूत उमेदवारांना पक्षात घेत पक्षबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे.
बडगुजर यांच्याप्रमाणेच पूर्व मतदारसंघातील माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून भाजपच्या आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्याविरोधात विधानसभा लढवली होती. आता पुन्हा भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होत असल्याने स्थानिक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज असून त्यात विरोधाचे सूर उमटले आहेत.
तरीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला भाजपकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार (दि. १७) रोजी मुंबईत या प्रवेश सोहळ्याचे आयोजन होणार असून बडगुजर आणि गीते यांच्या समर्थकांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणूकीपूर्वी घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने घोलप पुन्हा स्वगृही परतले. मात्र आता घोलप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारी होणार्या प्रवेश सोहळयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









