नाशिक । भारतीय जनता पार्टीत शहराध्यक्षपदावरून चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. मात्र मुख्यमंत्री दौर्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष मिळाले असून नाशिक भाजप शहराध्यक्षपदाची धुरा सुनिल केदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव आणि यतीन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपांत पक्षाच्या घटनेनूसार संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाने काही शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. मात्र नाशिकबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या पदासाठी मोठी स्पर्धा दिसून आली. पालकमंत्री पदाप्रमाणेच पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्याही रखडल्याने भाजपवर टिका होत होती.
अखेर भाजपकडून आज राज्यातील २२ जिल्हयातील शहारध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यापूर्वी केलेल्या नियुक्त्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पूर्वीच्याच पदाधिकार्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे नाशिकमध्येही विद्यमान पदाधिकार्यांनाच मुदतवाढ दिली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती.
मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नाशिक शहराध्यक्षपदी पक्षाचे निष्ठावंत सुनिल केदार यांची नियुक्ती केली आहे.
सुनिल केदार हे पक्षाच्या सरचिटणीसपदावर कार्यरत आहेत. नाशिकमध्ये भाजपचे जुने, निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. केदार यांच्याकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मितभाषी, मनमिळावू स्वभाव, मोर्चे आणि आंदोलनात सक्रिय सहभाग तसेच पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार तळागाळापर्यंत पोहचवण्याची हातोटी यामुळे त्यांची निवड पक्षातल्या रणनीतीचा भाग मानली जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहर व ग्रामीण भागात त्यांनी भरीव कामगिरी बजावलेली असून, निवडणुकीचे सखोल अनुभव त्यांच्या कामी येणार आहेत. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिकात भाजपने नाशिक महानगरपालिकेवर झेंडा फडकवला होता. त्यामुळे येणार्या निवडणुकीत पुन्हा तोच झेंडा फडकवण्याचं आव्हान सुनील केदार यांच्यासमोर आहे.
सुनिल केदार यांचा परिचय
नाव – सुनील रघुनाथ केदार
शिक्षण – बी कॉम
जन्मतारीख – १४/१२/१९६४
वय – ६०
वर्ग – हिंदु वंजारी
कारकीर्द
१९९० ते १९९९ सक्रिय कार्यकर्ता
१९९९ ते २००९ नाशिक भाजप व भाजयुमो प्रसिद्धी प्रमुख
२००९ ते २०१३ भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष
२०१३ ते २०१६ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस
२०१७ ते २०१९ भाजप नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष
२०१९ ते २०२५ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस.
चेअरमन – जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.
संचालक – कादवा सहकारी साखर कारखाना नाशिक,दिंडोरी
संचालक – नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन.
संचालक – ऊमराळे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्था.
सलग ५ विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात प्रवासी कार्यकर्ता प्रचारक.
राजस्थान कोटा येथे विधानसभा निवडणुकीत प्रवासी कार्यकर्ता प्रचारक.
प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग.
संस्थापक – पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था,पंचवटी,नाशिक.








