नाशिक : शिवसेना (शिंदे गट) चे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षात नाराज असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात गोडसे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि पक्षशिस्तीच्या अभावावर बोट ठेवले. मात्र, भाजप प्रवेशाबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.
माजी खासदार हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला. शिवसेनेत फुट पडल्यावर एकनाथ शिंदे यांना समर्थन देणार्यांमध्ये गोडसे हे अग्रभागी होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, मात्र शिवसेना (उबाठा गट) चे राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. सध्या गोडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
या संदर्भात बोलताना गोडसे यांनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. मात्र, पक्षांतर्गत स्थानिक स्तरावर जी शिस्त आणि संघटन बांधणी होणे आवश्यक आहे, ती होताना दिसत नाही. याकडे पक्षाने लक्ष दिल्यास आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये याचा फायदा पक्षालाच होईल.
जिल्ह्यात एक आमदार आहे. मात्र, पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने आमदारांकडूनही हवे तसे काम होताना दिसत नाही,” असे सांगत गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
कोणत्याही पक्षात आपण पाहतो की, जसे भाजपमध्ये पक्ष संघटन आणि लोकप्रतिनिधी हे स्वतंत्र भाग आहेत आणि प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत असतो. इतर पक्षांची संघटनात्मक बांधणी अभ्यासून स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारची संघटन बांधणी होणे आवश्यक आहे. तसेच पक्षांतर्गत शिस्तही असायला हवी. आज अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येते. प्रत्येक पक्षात काही छोटे-मोठे वाद असतातच, मात्र हे वाद चार भिंतीत सोडवले गेले पाहिजेत.
कार्यकर्त्यांची काही छोटी-मोठी कामे असतात. आपले पदाधिकारी जनतेला सहज उपलब्ध झाले पाहिजेत. मात्र, सध्या प्रत्येक गोष्टीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जावे लागते. पक्षांतर्गत संघटन नसल्यामुळेच हे घडते, आणि तसे होऊ नये. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षाचे कामकाज झाले पाहिजे. पण एकूणच परिस्थिती पाहता तसे होताना दिसत नाही. पक्ष संघटना आणि शिस्त यांचा कुठेतरी अभाव आहे, असे गोडसे यांनी स्पष्ट केले.
पक्षनेते एकनाथ शिंदे हे प्रचंड मेहनती आहेत. जनतेला ते सहज उपलब्ध होतात. परंतु, स्थानिक पातळीवरही तसेच काम व्हायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पक्षात राजकीय पुनर्वसन झाले नाही त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेत तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








