बडगुजर भाजपमध्ये येणार ? आमदार हिरे आक्रमक

नाशिक ।भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या स्थानिक नेत्या यांनी थेट विरोधाची भूमिका घेतली आहे. बडगुजर यांचा पक्षप्रवेश म्हणजे पक्ष बॅकफुटवर नेण्याचा मार्ग आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

पक्षाला आगामी महापालिकेत सत्ता आणायची असेल तर बडगुजर यांना प्रवेश देऊ नये अशी स्पष्ट भूमिका आमदार सीमा हिरे यांनी घेतली आहे.


शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची शिवसेना उबाठा गटातून हकालपटटी करण्यात आली. त्यामुळे बडगुजर हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र भाजपांत बडगुजर विरोधात नाराजीचा सुर आहे.

याबाबत आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला.
हिरे म्हणाल्या की, २०१४ आणि २०२४ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये मी स्वतः बडगुजर यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

या काळात आमच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी अन्याय केला, धमकावले, आणि भाजप नेत्यांची बदनामी केली. नारायण राणेंवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.

त्यांनी बडगुजर यांच्यावर गुन्हेगारी आरोप करताना म्हटले की, त्यांच्यावर गुन्ह्यांची मालिकाच आहे. कार्यकर्त्यांवर गोळीबार प्रकरणात त्यांच्या मुलाचे नाव समोर आले, मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबतचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशी प्रतिमा असलेले व्यक्ती भाजपमध्ये आल्या तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढेल.

वरीष्ठांकडून बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यांना पक्षात स्थान देणे म्हणजे पक्षाच्या मूल्यांशी प्रतारणा आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणाची गंभीर दखल वरीष्ठ नेत्यांनी घ्यावी, याबाबत वरीष्ठांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!