प्रसाद हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक । नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आणि सामाजिक वारसा लाभलेले प्रसादबापू हिरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हजारो समर्थक कार्यकर्त्यांनीही एकत्रितपणे पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार सीमाताई हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसाद हिरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने पक्षात प्रवेश केलेला नाही. मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचा विकास आणि सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी भाजपमध्ये पुन्हा सहभागी होत आहे. ही माझी ’घरवापसी’ आहे. जनतेच्या सेवा कार्यासाठी, वन्यजीव व निसर्ग संवर्धनासाठी काम करणे हाच माझा खरा उद्देश आहे.

प्रसाद हिरे यांचा परिचय

प्रसाद हिरे हे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नातू आणि माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी सहकार, शिक्षण, उद्योग आणि राजकारणाच्या विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, मालेगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच, कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट आणि डॉ. बी. व्ही. हिरे हायटेक टॅक्सटाईल क्लस्टरचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत

error: Content is protected !!