होय, भाजप वॉशिंग मशीन आहे – सुनील केदार

नाशिक । शिवसेना (ठाकरे गट) कडून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाट्यमय वळण लागले आहे. मुंबईत हजारो समर्थकांसह बडगुजर भाजप प्रवेशासाठी रवाना झाले असताना, दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या माहितीत बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत काहीच नाही, असे म्हणत गोंधळ वाढवला. या पार्श्वभूमीवर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

केदार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भाजप वॉशिंग मशीन आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. विविध पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी कोणतीही अट नाही. मोबाईल नंबर 8800002024 वर डायल करून देशातील कुणीही ऑनलाईन सदस्य होऊ शकतो.

भाजपची कार्यपद्धती स्वीकारणे अनिवार्य
सुनिल केदार पुढे लिहितात, भाजपमध्ये येणार्‍या व्यक्तीने पक्षाची कार्यपद्धती, ध्येयधोरणे स्वीकारली पाहिजेत. इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याही वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. म्हणजेच, आपला भूतकाळ सोडून नव्या मूल्यांना स्वीकारणे हे भाजप प्रवेशासाठी महत्त्वाचे आहे.

लोकशाहीत डोक्याचं महत्त्व
केदार यांनी स्पष्ट केलं की, लोकशाहीत डोक्याला जितके महत्त्व आहे, तितकेच त्या पक्षात किती डोकी आहेत हेही महत्त्वाचे आहे.त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख करत सांगितले की, एक मताने सरकार कोसळल्याने देशाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे भाजपात कोणीही प्रवेश करत असेल आणि पक्षाची रचना व कार्यपद्धती स्वीकारत असेल, तर त्यावर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!