नाशिक: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर सडेतोड मत मांडलं.
कांद्याचे निर्यात शुल्क आणि हमीभावाचा मुद्दा
मंत्रालयात कांदे घेऊन आंदोलन केलं, झेलमध्ये गेलो… उशिरा का होईना सरकारला शहाणपण आले,” असं सांगताना त्यांनी कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल सरकारचा उशीराने घेतलेला निर्णय जाहीरपणे निषेध केला. वेळेवर निर्णय घेतला असता तर भाव पडले नसते, याची जबाबदारी सरकारची आहे,” असं ठणकावून सांगत १५०० रुपयांचा हमीभाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
शेतकऱ्यांची आत्महत्या
परभणीत शेतकऱ्याची व त्याच्या गरोदर पत्नीची आत्महत्या उल्लेखून, शेट्टी म्हणाले, “शेतकरी मरत आहेत आणि दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या घरी १.५ कोटींचा आमरस-मोदक महोत्सव होतो.” हजारो कोटी आमदारांच्या सुरक्षेसाठी… पण शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली.
बँका, कर्जमाफी आणि सावकारीचा सापळा
नाशिक जिल्हा सहकारी बँक आणि तिच्या अडचणी यावर भाष्य करत त्यांनी स्पष्ट केलं, “२.४० लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे कर्ज मिळत नाही. सावकाराकडे जायची वेळ येते. सरकारने बँकेला ६३५ कोटींची मदत केल्यास ती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिकविमा घोटाळा
५० हजार कोटींचा नफा विमा कंपन्यांनी मिळवला आहे, हे सरकारच्या पाठबळाशिवाय शक्य नाही, असं सांगून, शेट्टींनी या योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. वाहन अपघाताप्रमाणे शेतकऱ्यांनाही भरपाई मिळायला हवी, हे त्यांची ठाम मागणी होती.
‘लाडकी बहीण’ योजनेवर थेट आरोप
ही योजना म्हणजे निवडणूक लाच आहे,” असा आरोप करत शेट्टी म्हणाले, “१५०० रुपये बहिणीला देण्याऐवजी शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा.”
बच्चू कडू शेतकरी आंदोलनात काम करतील, तर आम्ही सोबत घेऊ,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी एकजूट निर्माण करण्याचा इशारा दिला. ठाकरे बंधूंविषयी विचारता ते म्हणाले, ते सोबत आले तर आनंद, पण हेतू काय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सातबारा कोरा करण्याची मागणी
सातबारा कोरा करण्याची घोषणा केली पण केवळ उद्योगपतींना माफ केलं, शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही, आमची भूमिका पहिल्यापासून कठोर आहे आणि आम्ही लढतच राहणार, असं त्यांनी सांगितलं











