शरद पवार आजपासून तीन दिवस नाशिक दौर्‍यावर

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पवार यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. यादौर्‍यात पक्षाच्या राज्यव्यापी शिबीरासह शेतकरी आक्रोश मोर्चात ते सहभागी होणार आहेत. शनिवार (दि.१३) रोजी त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. रविवार (दि.१४) रोजी राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षाच्यावतीने (दि.१४) रोजी आडगाव नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तर (दि.१५) रोजी नाशिकमधून शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे.

नुकताच मनसे-उबाठा गटाचा आक्रोश मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि उबाठाचे खासदार संजय राऊत हे या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी खा.राऊत यांनी दोन्ही पक्ष आता एकत्रित आले आहेत आणि यापुढेही संयुक्तरित्याच कार्यक्रम राबवणार असे विधान केले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षाचे सर्व नेते तसेच राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कर्जमाफीसह विविध मुददयांवर पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधून मोर्चा काढण्यात येणार आहे. अनंत कान्हेरे मैदानावरून हा मोर्चा काढण्यात येणार असून विंचुरकर चौक, सीबीएस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर येथे सभा होणार आहे.

या आहेत मागण्या
शेतकरी कर्जमाफी
शेतमालाला व दुधाला हमीभाव
बोगस खत बियाणे विकणार्‍यांवर कठोर करवाई करावी
निसाका कारखान्याबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा
वाढती बेरोजगारी, महिला अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

error: Content is protected !!