दोन दौरे रद्द झाल्यानंतर अखेर राज ठाकरे सोमवारी नाशिक दौऱ्यावर

नाशिक । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवार (दि.26) रोजी सकाळी साडेनऊ वाजता नाशिक मध्ये दाखल होत आहेत. यापूर्वी देखील दोन वेळा राज ठाकरे यांचा नाशिक दौरा निश्चित करण्यात आला होता मात्र अचानकपणे हा दौरा रद्द करण्यात आला. अखेर सोमवारी राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. १५ आणि १६ मे असा दोन दिवसांचा दौरा यापूर्वी निश्चित करण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात बैठकीसाठी पाचरणही करण्यात आले होते. मात्र अचानकपणे हा दौरा रद्द झाल्याने मनसैनिकांचा हिरमोड झाला होता.

मनसेत पक्षांतर्गत नाराजीची दखल घेत काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येउन पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’ संवाद साधला होता. मात्र त्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला.

नाशिकमध्ये मनसेला अभूतपूर्व यश मिळाले. तीन आमदार, ४० नगरसेवक असे भरभरून मनसेला देत नाशिककरांनी मनसेवर विश्वास दाखवला. मात्र गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी नाशिककडे केलेले दुर्लक्ष, संघटनात्मक नाराजी यामुळे स्थानिक स्तरावर पक्षाची यंत्रणा खिळखिळी झाली. नंतरच्या काळात नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. अमित ठाकरे यांनी अधून मधून नाशिकमध्ये येत नाराजांशी चर्चा करत पक्ष संघटनेला ताकद देण्याचा प्रयत्न केला.

आता पुन्हा एकदा नाशिकची सुत्र राज ठाकरे यांनी हाती घेतली आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक दौरा करत पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौर्‍यात ते पदाधिकार्‍यांशी संवाद साधतील. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे हॉटेल एस.एस. के येथे आगमन होणार असून यानंतर ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. मनसेच्या कार्यालयाचे सध्या नूतनीकरण सुरू असून राज ठाकरे हे कार्यालयाच्या कामाची पाहणी करण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!