मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा रदद

नाशिक । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १५ आणि १६ मे रोजी नाशिक दौर्‍यावर येणार होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात होता. परंतू काही कारणास्तव राज ठाकरे यांचा नाशिक दौरा रदद करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मनसेत पक्षांतर्गत नाराजीची दखल घेत काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येउन पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’ संवाद साधला होता. मात्र त्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला.

नाशिकमध्ये मनसेला अभूतपूर्व यश मिळाले. तीन आमदार, ४० नगरसेवक असे भरभरून मनसेला देत नाशिककरांनी मनसेवर विश्वास दाखवला. मात्र गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी नाशिककडे केलेले दुर्लक्ष, संघटनात्मक नाराजी यामुळे स्थानिक स्तरावर पक्षाची यंत्रणा खिळखिळी झाली. नंतरच्या काळात नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. अमित ठाकरे यांनी अधून मधून नाशिकमध्ये येत नाराजांशी चर्चा करत पक्ष संघटनेला ताकद देण्याचा प्रयत्न केला.

आता पुन्हा एकदा नाशिकची सुत्र राज ठाकरे यांनी हाती घेतली आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक दौरा करत पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती केली. काही दिवसांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मानला जात होता मात्र आता हा दौरा रदद करण्यात आला आहे. या दौर्‍यात ते पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार होते. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

error: Content is protected !!