शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील फुटीमुळे आता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीतून बाहेर पडत राज्यात निर्धार शिबीर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईनंतर सर्वप्रथम नाशिकमध्ये ठाकरे गटाचा हा निर्धार मेळावा होत आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतू राज्यातील सत्तांतरात नाशिकचे बुरूजही ढासळले.
ठाकरे परिवाराचे नाशिकवर विशेष असे प्रेम राहीले आहे. १९९४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमधूनच दार उघड बये दार उघड अशी साद घातली होती. १९९५ मध्ये शिवसेनेसाठी सत्तेचे दरवाजे उघडले गेले होते. आता पुन्हा एकदा उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत होणारया निर्धार मेळाव्यातून आगामी निवडणूकीत ठाकरे गटाला कितपत यश मिळते यावर सारे चित्र अवलंबून असेल.
नाशिक येथे १६ एप्रिल रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा विभागीय निर्धार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे होणार्या या निर्धार शिबीरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण दाखविणार असून हे या शिबीराचे वैशिष्टय राहणार आहे.
या शिबिरासाठी सर्व विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येतात. अनेक विषयांवर चर्चा, मंथन, चिंतन होणार आहे. सकाळी 9.30 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता उद्धव ठाकरे या शिबिरासाठी उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे हे शिबिरासाठी मार्गदर्शन करतील. अंबादास दानवे, चंद्रकात खैरे, असीम सरोदे हे देखील पदाधिकारी आणि कार्कार्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिबिरात न ऐकलेले भाषण दाखविण्यात येणार आहे. एक प्रकारे बाळासाहेब यांची या शिबिराला उपस्थिती असेल. प्रत्येक पदाधिकार्याने शिबिरासाठी वाहून घेतले आहे. ठाकरे परिवार आणि नाशिकचे प्रेम असे आहे म्हणूनच मुंबई बाहेरचे पहिले शिबिर नाशिकमध्ये होत आहे.
शिवसेना अन नाशिकचा असा आहे ॠणानुबंध
शिवसेनेच्या स्थापनेमध्ये नाशिकचे महत्वाचे स्थान राहीले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर शिलान्यासाच्या दुसर्या दिवशी नाशिकच्या रामभूमीतून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनंत कान्हेरे मैदानावर अधिवेशन घेत लोकसभा, विधानसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकले होते. लोकसभा निवडणूकी दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावला मात्र लोकसभा निवडणूकीत ठाकरे गटाचे खासदार निवडून आल्याने शिवसैनिकांचा उत्साह दुणावला.
विधानसभा निवडणूकीत मात्र पक्षाची पिछेहाट झाली. मध्यंतरी पक्षाला गळती लागली. अनेक माजी नगरसेवकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात प्रवेश केला. तर अनेकजण भाजप, शिंदे गटाच्या वाटेवर आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजुबत करण्यासाठी, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ देण्यासाठी नाशिकमध्ये या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले











