शरद पवारांचा नाशिक दौरा, शेतकरी मोर्चासह कार्यकर्ता शिबिर

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस नाशिक दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात पक्ष कार्यकर्ता शिबिर आणि शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात नाशिकचे पदाधिकारी सोमवार (दि.१) रोजी शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई येथे गेले असून या बैठकीत कार्यक्रमाची तारीख आणि स्थळ निश्चित करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात नाशिक दौर्‍यावर आलेले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शेतकरी प्रश्नी शरद पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधून एल्गार पुकारण्याचे सुतोवाच केले होते. यासंदर्भात लवकरच तारीख जाहीर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार आता १४ आणि १५ सप्टेंबर रोजी शरद पवार नाशिक दौर्यावर येण्याची शक्यता आहे.

१४ सप्टेंबर रोजी शहरात पक्ष कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात येणार असून शिबिरातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनिती आखण्यात येणार आहे. तसेच शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. आडगाव नाका येथील स्वामी नारायण सभागृह येथे हे शिबिर आयोजित करण्याबाबत पक्षात विचारविनिमय करण्यात येत आहे.

१५ सप्टेंबर रोजी भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्वतः शरद पवार सहभागी होणार असून कांदा दराचा प्रश्न, पीक विमा, ऊस उत्पादकांचे प्रश्न, ओला दुष्काळ, कर्जमाफी आदी प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे.

शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने कांदा, तूर, मूग यांची खरेदी होत आहे. सरकारने हमीभावानुसार तत्काळ खरेदी सुरू करावी, तसेच ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.


शरद पवार स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

error: Content is protected !!