Shard pawar : देवाभाऊ आपल्या आजूबाजूला काय घडतंय बघा ; शरद पवारांचा हल्लाबोल

नाशिक । देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले. तुम्ही शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. देवाभाऊ शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकर्‍यांना घेता आला, ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराजांचे नाव घेत असून बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही. नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमध्ये सरकार गेले आणि भगिनींच्या हाती राज्य आलं, आणखी मी काय बोलणार अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

राष्ट्रवादीच्यावतीने नाशिकमधून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अनंत कान्हेरे मैदान येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात स्वतः शरद पवार सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातला शेतकरी अस्वस्थ आहे. बीडसारख्या जिल्ह्यात जिथे कायम दुष्काळ असतो तिथे अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतकरीवर झाला. संकटातून मार्ग काढायचा असतो, तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. आज राज्यकर्ते शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. देवाभाऊ म्हणत निनावी जाहिरातींचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

कृषीमंत्री असताना एके दिवशी माझ्या वाचनात आले की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. दुसर्‍या दिवशी मनमोहन सिंह यांना विनंती केली, शेतकरी आत्महत्या करतोय, त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही. त्यासाठी त्या ठिकाणी जायला हवे. दुसर्‍या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो, तिथे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. जेव्हा मी आत्महत्येचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सावकारी जाचामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर दहा दिवसांत आम्ही ७० हजार कोटी कर्जमाफी केली. या सरकारला शेतकर्‍यांचे दुःख समजत नाही असे ते म्हणाले.

error: Content is protected !!