नाशिकमध्ये ठाकरे-मनसे गटाचा संयुक्त मोर्चा, ठाकरे बंधूंना निमंत्रण

नाशिक । शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, कृषी मालासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्यावतीने १२ सप्टेंबर रोजी संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मनसे कार्यालयात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या मोर्चासाठी दोन्ही ठाकरे बंधूंना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी सांगितले.

मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष डी. जी. सुर्यवंशी, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गीते, ग्रामीण संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सुजाता डेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहर व जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. कांद्याचे दर कोसळत आहेत. नाफेडचा भ्रष्टाचार, खते, बियाण्यांमध्ये घोटाळा यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. नाशिक महापालिकेत महायुतीकडून घुसखोरी करून प्रभाग रचनेत फेरफार करत, नियम धाब्यावर बसवून रचना बदलण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरातील पाणी प्रश्न, खड्ड्यांची समस्या, उद्याने, जॉगिंग ट्रॅकची झालेली दुरवस्था, कुंभमेळ्याच्या नावाखाली ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना पुन्हा काम देणे, महापालिकेतील निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार – या सर्व विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याकरिता विभागवार बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या मोर्चासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. अनंत कान्हेरे मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हाभरातून कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

यावेळी नामदेव पाटील, मनोज घोडके, संतोष शहाणे, प्रमोद साखरे, धीरज भोसले, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, सचिन सिन्हा, विनायक पगारे, विशाल भावले, विजय अहिरे, ज्ञानेश्वर बगडे, विजय ठाकरे, राकेश परदेशी, किरण शिरसागर, अविनाश पाटील, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, जनहित कक्ष विधी विभाग प्रफुल बनबैरू, तुषार गांगुर्डे, शैला शिरसाट, अजिंक्य पारक व पदाधिकारी उपस्थित होते.

या विषयांवर चर्चा

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था

शेतकरी प्रश्न

नाफेड भ्रष्टाचार, खते-बियाण्यांतील घोटाळे

प्रभाग रचनेतील फेरफार, निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना काम

पाणीटंचाई, खड्ड्यांचा प्रश्न

उद्याने व जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

error: Content is protected !!