नाशिक । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. नुकतीच उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये या दोन्ही पक्षांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्तपणे नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बी.डी. भालेकर मैदान, त्र्यंबक नाका, दुधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर तसेच शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते.
यावेळी संजय राऊत यांनी जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, शिवसेना-मनसेचे नेते दोघे एकत्र आले, आता अजून काय होणे बाकी आहे? नाशिकमधील प्रत्येक कार्यक्रम हा संयुक्तच होणार. फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातही होणार आहे. शिवसेना आणि मनसेचे मूळ आणि कुळ एकच आहे, त्यामुळे यापुढे हा महाराष्ट्र आता ठाकरेंच्याच मागे जाईल, हा संदेशसुद्धा नाशिकने दिला आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.
आम्हा सर्वांचा मायबाप एकच आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. यापुढे तुम्हाला आमचा सामना करताना काळजी घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी सत्ताधार्यांना दिला. महापालिका, जिल्हा परिषद असतील तिथे परिवर्तन करावे लागेल. या जनआक्रोश मोर्चातून आपण आव्हान उभे केले आहे. ते आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असे खासदार संजय राऊत म्हणाले.
भाजपने नाशिकची वाट लावली : बाळा नांदगावकर
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक नाशिक विधानावर बोलताना सांगितले की, “ज्या नाशिकला दत्तक घेतले होते त्या नाशिकला काय मिळाले? केंद्रात तुमचे सरकार, गल्लीत तुमचे सरकार आहे. त्यामुळे नाशिककरांनी तुमच्यावर विश्वास टाकला की काहीतरी चांगले होईल. पण इथले उत्तम प्रकारचे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसायचे काम तुम्ही केलेले आहे. खोटारडेपणाचा आता कळस झालेला आहे,” असा हल्लाबोल त्यांनी भाजप सरकारवर केला.
मोर्चात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र
या मोर्चात मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकारविरोधात निषेध नोंदवला. वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकर्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्स अवैध धंद्यांविरोधात विविध प्रात्यक्षिके कार्यकर्त्यांकडून मोर्चात सादर करण्यात आली.











