Sharad pawar : शरद पवारांचं ‘मिशन नाशिक’, असा आहे दौरा

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे राज्य अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार हे नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण असून या अधिवेशनातून पवार काय रणनिती आखतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नाशिक जिल्हा कायम शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याने शरद पवार यांच्या पक्षाला साथ दिली. मात्र विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ दिली. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा नाशिकची निवड केली आहे.

१४ आणि १५ सप्टेंबर रोजी पवार हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी आडगाव नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे सर्व नेते तसेच राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

बळीराजा आक्रोश मोर्चा
१५ सप्टेंबर रोजी शेतकरी प्रश्नावर शरद पवार यांच्या नेतृत्वात अनंत कान्हेरे मैदान येथून बळीराजा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, कांद्याला दर, दुधाला भाव, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भव्य असणार असून या मोर्चासाठी जिल्हाभरातून शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. पक्षस्तरावर मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हानिहाय तसेच विविध सेलनिहाय बैठका घेण्यात येत असून मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे.

असा असेल मोर्चाचा मार्ग
अनंत कान्हेरे मैदानावरून हा मोर्चा काढण्यात येणार असून विंचुरकर चौक, सीबीएस, शालीमार, नेहरू उद्यान, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.


पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नाशिक दौरा पक्षासाठी बळ देणारा ठरणार आहे. या दौऱ्यात पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून यावेळी पक्षाध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १५ सप्टेंबर रोजी शरद पवारांच्या नेतृत्वात शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • गजानन शेलार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष
error: Content is protected !!