मुंबई । केंद्र सरकारच्या ‘उडान 5.5’ योजनेअंतर्गत नाशिकच्या गंगापूर धरणासह आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे पर्यनवाढीस चालना मिळणाार असून या सेवेमुळे महाराष्ट्रातील दुर्गम भाग हवाई मार्गाने जोडले जाणार असून, पर्यटन क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे. या सेवेसाठी किती असेल तिकीट दर ? कधी सुरू होणार सेवा या विषयी उत्सुकता आहे.
परवडणार्या हवाई सेवांद्वारे देशातील विविध भागांना एकमेकांशी जोडणे, विशेषतः पर्यटनस्थळे आणि दुर्गम भाग. या योजनेअंतर्गत देशभरात १५० जलस्थळांवर ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
अर्थात दहा वर्षांपूर्वी गंगापूर धरणातून सी प्लेन लँडिंगची चाचणी घेण्यात आली होती. मेहेर कंपनीमार्फत ही चाचणी घेण्यात आली. यावेळी डीजीसीएने लँडिंग आणि उडडाणास परवानगीही दिली होती. त्यावेळी जुहू चौपाटी ते गंगापूर धरण अशी ‘सी प्लेन’ सेवा सुरू करण्याठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यानूसार तीन वेळा पूर्ण नियोजन होऊनही ते रदद झाल्यानंतर ही चाचणी यशस्वी करण्यात आली.
धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मात्र, त्यावेळी ‘सी प्लेन’ सेवेमुळे गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. धरणात उतरतांना ‘सी प्लेन’ भरकटले किंवा सी प्लेनचा स्फोट झाला तर हाहाकार माजू शकतो अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली होती. यामुळे पर्यावरण, नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच धरण सुरक्षितता यावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका काही जणांनी घेतली होती. यावेळी पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत ग्रीन ट्रयुबिनलकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.
सी-प्लेनसाठी प्रस्तावित ठिकाणे –
धोम धरण (वाई, सातारा)
गंगापूर धरण (नाशिक)
खिंडसी धरण (नागपूर)
कोराडी धरण (मेहकर, बुलढाणा)
पवना धरण (पवनानगर, पुणे)
पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
गणपतीपुळे (रत्नागिरी)
रत्नागिरी (रत्नागिरी)
तिकिट दर किती?
या सेवेसाठी प्रवाशांना अंदाजे १५०० ते २००० रूपये दरम्यान शुल्क आकारले जाईल. केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी ‘गॅप फंडिंग’द्वारे (व्यवहार्यता अनुदान) सहाय्य केले जाणार आहे. इंडिगो, पवनहंस यांसारख्या नामांकित कंपन्या ही सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत.
कधी सुरू होणार सेवा ?
प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांमध्येही ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. कॅनडातील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ या कंपनीची विशेष विमाने यासाठी वापरली जाणार आहेत.
पर्यटन क्षेत्राला चालना
या सेवेमुळे निसर्गरम्य ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार असून, राज्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. खासगी गुंतवणुकीसाठीही संधी उपलब्ध होणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीला हातभार लागेल.










