मुंबई । राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्रिभाषा सूत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडली असून, मनसेकडून या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील अनेक साहित्यिक, भाषा अभ्यासक, तसेच विविध राजकीय पक्षांकडून या निर्णयावर विरोध दर्शविण्यात आल्याने राज्य सरकारकडून यावर चर्चा करण्यासाठी विविध स्तरांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज झालेल्या भेटीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “राज ठाकरे यांना सरकारचा सध्याचा निर्णय मान्य नाही. त्यांनी तिसर्या भाषेच्या संदर्भात काही मोलाच्या सूचना दिल्या आहेत, त्यांचा आम्ही नक्कीच विचार करू. हिंदीच्या सक्तीविषयी राज ठाकरे यांचा ठाम विरोध आहे.
दादा भुसे यांनी स्पष्ट केलं की या चर्चेत अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. मात्र, ही चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
२३ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रावर मुंबईतील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, तज्ज्ञ, साहित्यिक, आणि संबंधित सर्व घटकांशी सल्लामसलत केल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाईल. नवीन शैक्षणिक धोरण आणि मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
यासंदर्भात सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, सर्व संबंधितांच्या मतानुसार राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.









