नाशिक । देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई सेवेशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशातील १५० मार्गांवर सी-प्लेन सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यात महाराष्ट्रातील आठ ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्यात येणार असून नुकतीच सातारा जिल्ह्यातील धोम धरणावरून या सेवेला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आता गंगापूर धरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून चाचणी
यापूर्वी नाशिकमध्ये २०१४ मध्ये छगन भुजबळ पालकमंत्री असताना गंगापूर धरणात सी-प्लेनचे परीक्षण करण्यात आले होते. यावेळी सी-प्लेनची चाचणीही घेण्यात आली. मात्र त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी या सेवेला प्रखर विरोध दर्शवला. गंगापूर धरणावर या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. गंगापूर धरणातून नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान देखील आहे. त्यामुळे त्यावेळी पर्यावरणवाद्यांनी गंगापूर धरणात या सेवेला विरोध केला होता.
पुन्हा एकदा गंगापूर धरणाची निवड
आता पुन्हा एकदा गंगापूर धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे पर्यावरणवाद्यांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सी-प्लेन सेवा पर्यावरणावर काय परिणाम करेल, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकते. ही सेवा सुरू झाल्याने निश्चितच पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल आणि दळणवळण सुधारेल. मात्र पर्यावरणाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
खर्च किती?
सरकारने कमी गॅप फंडिंग देण्यास होकार दिल्याने या जलवाहतूकीचे शुल्क दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असेल. त्यामुळे हे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्याजोगे आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही सेवा पोहोचवली जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक विभागातील अधिकार्यांनी दिली.
या आठ ठिकाणांहून सी-प्लेन सुविधा
धोम धरण वाई सातारा, गंगापूर धरण, खिंडसी धरण, कोराडी धरण, पवना धरण, पेंच धरण, गणपतीपुळे आणि रत्नागिरी या आठ ठिकाणांहून सी-प्लेन उड्डाण करणार आहे.
कोणत्या कंपन्यांनी दाखवली रुची?
इंडिगो आणि पवन हंस यांसारख्या विमान कंपन्यांनी देशात सी-प्लेन सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. या सेवांना ‘उडान’ योजनेअंतर्गत प्रोत्साहनही दिले जाईल.











