Nashik Flood : गोदावरी धोक्याच्या पातळीवर

नाशिक । नाशिक शहरासह जिल्हयात रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरण पालणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असून नागरीकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून ६८ हजार ४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये पुराचे पारंपारिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंडया मारूतीच्या छातीला पाणी लागले असून दुपारनंतर मारूती पुर्णपणे पुराच्या पाण्यात बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या काश्यपी, गौतमी गोदावरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. दोन्ही धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणात येतो. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग हा शहराकडे गोदावरीला येऊन मिळतो त्यामुळे गंगापूर धरणातून दुपारी दोन वाजता ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

पुणेगाव धरणातून उनंदा नदीमध्ये ३८४० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाचे प्रमाण बघता यात वाढव होणार असून उनंदा नदीकाठच्या नागरीकांनी नदीप्रवाहात जाउ नये तसेच नदीकाठा लगतच्या पशु- धन चीजवस्तू, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे आवाहन ओझर खेड कालवा उपविभागीय अधिकार्‍यांनी केले आहे.

याव्यतिरिक्त गोदावरी नदीला येउन मिळणार्‍या नदी नाले यांच्या विसर्गाचा देखील सामावेश झालेला असल्याने होळकर पुल येथे सद्यस्थितीत १८४७.५० फुट इतकी पाणी पातळी असून १३०४५.७२ क्यसेक इतका विसर्ग सुरू आहे. होळकर पुल येथे धोका पातळी १८४९.५० फुट व इशारा विसर्ग १९०७९ क्युसेक आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असून यामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

धरणातून सुरू असलेला विसर्ग
दारणा १२१६७
गंगापूर ८६८४
वालदेवी ८१४
आळंदी २७१७
होळकर पुल १४१९१
भावली ८२२
भाम २०९३
वाघाड १७३०
पालखेड ३६३५८
नांदुर मध्यमेश्वर ६८४८०
गौतमी गोदावरी २०१६
कश्यपी १२८०
ओझरखेड ३८७०
पुणेगाव ३८४०
मुकणे १९५०
वाकी १३२१

error: Content is protected !!