नाशिक । नाशिक त्रयंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोटयावधी भाविक नाशिकमध्ये येणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. कुुंभमेळयाच्या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. यातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीबरोबरच मोठा महसूलही मिळणार आहे. याच अनुषंगाने नाशिककरांनाही कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या वाढत्या पर्यटन महत्त्वाला अनुसरून, महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचे चर्चासत्र आयोजिले जात आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) यांच्या वतीने ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयात (४९, ५ वा मजला, बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, मुंबईनाका, नाशिक) हे चर्चासत्र पार पडणार आहे.
या चर्चासत्रात राज्य पर्यटन विभागाच्या प्रकल्प अधिकारी गायत्री साळुंके या महिला केंद्रित पर्यटन धोरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेल्या या धोरणाअंतर्गत पर्यटन क्षेत्रात महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जावरील व्याजाची परतफेड पर्यटन संचालनालयामार्फत बँक मान्यतेनुसार केली जाईल.या कार्यक्रमात नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी हे चर्चासत्र फारच उपयुक्त ठरणार आहे. चर्चासत्र विनामूल्य असून सर्वांसाठी खुले आहे, मात्र नावनोंदणी आवश्यक आहे.
४१ प्रकारच्या पर्यटन व्यवसायांसाठी देणार मदत
कॅरॅव्हॅन सेवा
साहसी पर्यटन (जमीन, जल, आकाश)
कृषी पर्यटन केंद्र
रिसॉर्ट, हॉटेल, टेंट, ट्री हाऊस
वूडन कॉटेजेस, बी अॅण्ड बी
महिला चलित कॉमन किचन
मेडिकल टुरिझम
टूर्स अँड ट्रॅव्हल्स
पर्यटक सुविधा केंद्र
इतर पर्यटन प्रकल्प
येथे करा संपर्क
सहभाग नोंदवण्यासाठी ०२५३-२५७७७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव, शाखा चेअरमन अंजू सिंघल, को-चेअरमन भावेश मानेक व दिग्विजय मानकर, तसेच कार्यकारिणी सदस्य राजाराम सांगळे आणि संजय राठी यांनी केले आहे.











