ओझर विमानतळाने गाठला नवा टप्पा! एप्रिलमध्ये विक्रमी ३६ हजार प्रवाशांची नोंद

नाशिक । नाशिकच्या ओझर विमानतळावरून एप्रिल २०२५ मध्ये विक्रमी ३६,०८१ प्रवाश्यांनी हवाई प्रवास केला असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली आहे. ओझर विमानतळ सुरु झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक झाल्याचे नोंदले गेले आहे.


२०२३-२४ या आर्थिक वर्षात ओझर विमानतळावरून एकूण २,४२,३७२ प्रवासी प्रवास करत होते. मात्र २०२४-२५ मध्ये ही संख्या ३,४१,११२ वर पोहोचली, म्हणजेच ४०.७ टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे एप्रिल २०२५ मध्येच १७,८१० प्रवासी नाशिकमध्ये उतरले, तर १८,२७१ प्रवाश्यांनी येथेून उड्डाण केले. मार्च २०२५ मध्ये ३४,३४९ प्रवाशांनी प्रवास केला होता, तर एप्रिलमध्ये हा आकडा वाढून ३६,०८१ झाला – मासिक स्तरावरही लक्षणीय वाढ.

पाच फ्लाइट्ससह सुलभ सेवा
२०१७ मध्ये प्रवासी सेवेसाठी खुले झालेल्या ओझर विमानतळाला केंद्र सरकारच्या ’उडान’ (UDAN) योजनेअंतर्गत गती मिळाली. सध्या इंडिगो एअरलाईन्सकडून अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि गोवा या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. हॉपिंग फ्लाइट्सची सुविधा मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.


सध्या दररोज ५ विमानसेवा येथे उपलब्ध असून, येत्या काळात आणखी शहरांशी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

मालवाहतुकीतही विक्रमी वाढ
प्रवासी वाहतुकीबरोबरच हवाई मालवाहतूक क्षेत्रातही ओझर विमानतळाने मोठी झेप घेतली आहे. मार्च २०२५ मध्ये एकूण ६६२ मेट्रिक टन माल पाठवण्यात आला, त्यामध्ये: १३.६ मेट्रिक टन देशांतर्गत वाहतूक, ६४९ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय निर्यात यांचा समावेश होता. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मार्च २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केवळ १८८ मेट्रिक टन होती, त्यामुळे अवघ्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय हवाई निर्यातीमध्ये ३.४ पट वाढ झाली आहे.

औद्योगिक आणि कृषी निर्यातीला गती
नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे, फळे, औषधे आणि यंत्रसामग्री यांची निर्यात होते. ओझर विमानतळावरील कार्गो टर्मिनलला मिळणारा प्रतिसाद हवाई निर्यात क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक संकेत मानला जात आहे. येत्या काळात आणखी आंतरराष्ट्रीय गंतव्यांसाठी थेट मालवाहतूक सेवा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया
ओझर विमानतळाहून विमान सेवा वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. काही प्रमाणात त्याची फलनिष्पत्ती दिसून येते. या सेवेमुळे प्रवासी सुविधा उपलब्ध तर झाली परंतू कृषी आणि औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा झाला आहे. आगामी कुंभमेळयाच्या अनुषंगाने या सेवेचा विस्तार करण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. लवकरच नाशिक शहर नवीन शहरांना जोडले जाईल. विमानतळावर आता नवीन धावपटटी तयार करण्यात येणार असल्याने या सेवेचा विस्तार होईल यामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
मनिष रावल,

अध्यक्ष एव्हिएशन कमिटी निमा

error: Content is protected !!