पुणेकरांसाठी खुशखबर.. पुणे मिरज रेल्वे मार्गाचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण

पुणे । मध्य रेल्वेने पुणे – मिरज दुहेरीकरण प्रकल्पात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सर्वाधिक आव्हानात्मक समजल्या जाणार्‍या शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे 9.45 किलोमीटर अंतराचे दुहेरीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, १७ जून २०२५ रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतर हा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे.

या कामामुळे पुणे – सातारा मार्गाचे १४५ किलोमीटर अंतराचे दुहेरीकरणही पूर्ण झाले असून, एकूण २७९ किलोमीटर लांबीच्या पुणे – मिरज प्रकल्पातील २५८ किलोमीटर अंतर आता कार्यान्वित आहे. हा प्रकल्प रेल्वे वाहतूक सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.

भौगोलिक आव्हानांवर मात
हा विभाग डोंगराळ, तीव्र वळणांचा आणि उंच उतारांचा असून, दुहेरीकरणासाठी अनेक अडचणींवर मात करावी लागली. या कामात १४० मीटर लांबीचा बोगदा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. १:१०० उतारामुळे अत्यंत अचूक बांधकाम आणि योजना राबवावी लागली. १३ भागांमध्ये विभागलेला एक मोठा पूल उभारण्यात आला. यातील सर्वात उंच खांब ४२ मीटर उंच आहे आणि हा पूल एका वर्षात पूर्ण करण्यात आला.

पाच मोठे पूल, ज्यामध्ये विशेष गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सर्वात उंच खांब १८.३ मीटर उंच आहे. ३० लाख घनमीटर मातीचा भराव, सर्वाधिक उंच भराव ३५ मीटरचा. २० लाख घनमीटर खोदकाम, काही ठिकाणी २५ मीटर खोदकाम करण्यात आले. २३ छोटे पूल बांधण्यात आले. १६ तीव्र वळणे, यामध्ये सहा अंशाचे वळण सर्वाधिक तीव्र.

या दुहेरीकरणामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून, गाड्यांचा वेळेवर धावतील तसेच, अधिक गाड्या चालवणे शक्य होईल आणि प्रवासी व मालवाहतुकीची क्षमता वाढेल. हा प्रकल्प हे मध्य रेल्वेचे अभिमानास्पद यश ठरत असून, भविष्यातील वाहतूक गरजांची पूर्तता करण्यासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे.

error: Content is protected !!