वाहतूक कोंडीवर उतारा : आ. फरांदे यांचा तीन महत्त्वपूर्ण रस्ते व पूल प्रस्ताव

नाशिक – शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधत, मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात वाहतूक व्यवस्थेवर ताण कमी करण्यासाठी समांतर रस्ते तसेच उड्डाणपूल उभारण्याचे तीन महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत.

आ. फरांदे यांनी नमूद केले आहे की, नाशिकचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्या सुमारे ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही संख्या ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शहरातील विद्यमान रस्ते अपुरे ठरत आहेत. सध्याच्या स्थितीत पाच किलोमीटरचा प्रवास करण्यासही अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्ते आणि पूल उभारणी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तीन प्रमुख प्रस्ताव

१) फॉरेस्ट नर्सरी ते वृंदावन लॉन्स रस्ता :
गंगापूर रोडवरील वाढती वाहतूक कमी करण्यासाठी सुयोजित गार्डनपासून आसाराम बापू पूल, चांदशी पूल, नवश्या गणपती मार्गे वृंदावन लॉन्सपर्यंत २४ मीटर रुंदीचा समांतर रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. बहुतेक जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याने हा रस्ता लवकर पूर्ण होऊ शकतो.

२) विद्या विकास सर्कल ते मखमलाबाद पूल :
गंगापूर रोडवरून पंचवटी भागाकडे जाण्यासाठी सध्या अशोक स्तंभ किंवा रविवार कारंजा मार्गांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे मोठी कोंडी निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून गोदावरी नदीवर विद्या विकास सर्कल ते मखमलाबाद दरम्यान पूल उभारण्याची सूचना करण्यात आली आहे.

३) सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर उड्डाणपूल :
एबीबी सर्कलपासून सिटी सेंटर मॉलमार्गे इंदिरानगर बोगदा व गोविंदनगरपर्यंतचा मार्ग सर्वाधिक वर्दळीचा आहे. सातपूर व अंबड एमआयडीसीमधून कामगारांची मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होते. भविष्यात उभारल्या जाणाऱ्या निवासी प्रकल्पांमुळे वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर उड्डाणपूल उभारणे व इतर सुधारणा करणे आवश्यक असल्याचे आ. फरांदे यांनी नमूद केले आहे.

त्यांनी या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी सिंहस्थपूर्वी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, जेणेकरून शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि भाविकांना त्रास सहन करावा लागणार नाही.

error: Content is protected !!