Nashik Rain : पुढील आठवडाभर पावसाची मुसळधार

नाशिक । मान्सूनच्या द्रोणीय स्थितीमुळे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा परिणाम देशभर जाणवणार आहे. राजस्थानच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे, तर बंगालच्या खाडीवर दोन सप्टेंबरपासून नव्या कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुंबईसह मध्य महाराष्ट्राला यंदा ऑगस्टमध्ये पावसाने चांगलेच झोडपले. लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस या भागात नोंदवला गेला. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच सातारा जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची नोंद झाली.

ऑगस्टमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील सात दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच गुजरात व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दोन सप्टेंबरपासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर तळ कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

३ सप्टेंबर : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

४ सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार व संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

error: Content is protected !!