नाशिक | ओझर विमानतळाच्या उड्डाण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, ३४३ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ही नवीन धावपट्टी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) तर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीच्या समांतर उभारली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिककरांना अधिक सुलभ आणि दर्जेदार विमानसेवा लाभणार आहे.
या प्रकल्पासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून धावपट्टीसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून, त्यानंतर आता ३४३ कोटींच्या निविदेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील वाढती विमानसेवा आणि प्रवासी संख्या लक्षात घेऊन, HAL ने नवीन धावपट्टी उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावाला HAL च्या संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर, तांत्रिक सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला.
या नव्या धावपट्टीच्या निर्मितीनंतर, सध्याच्या धावपट्टीवर डागडुजीचे काम सुरू असतानाही उड्डाणांची सेवा कायम ठेवणे शक्य होणार आहे. मंजुरीनंतर लगेचच उभारणी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प नाशिकसाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
आगामी काळात हा प्रकल्प वेगाने पूर्ण होऊन, नाशिकच्या हवाई सेवेला नवी गती मिळणार आहे.











