नाशिक । मुंबई ते नागपूर ७०१ किलोमीटरच्या समृध्दी महामार्गाच्या कामाला २०१९ ला सुरूवात झाली. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मधल्या काळात कोविडचे संकट या कारणाने हे काम रखडले मात्र हळूहळू एक एक टप्पा खुला करण्यात आला. आता सर्वात अखेरचा इगतपुरी ते आमणे ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा १ मे रोजी खुला होणार आहे.
इगतपुरी ते आमणे या समृध्दी महामार्गावरील आठ किलोमीटरचा बोगदा हे या मार्गाचे सर्वात महत्वाचे आकर्षण राहणार आहे. या बोगद्यामुळे कसारा घाट लागणारच नाही. कसारा घाटाचे १२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सध्या ४० मिनिटे लागतात. मात्र समृध्दी महामार्ग सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटांत कापलं जाणार आहे. हा बोगदा तयार करणे सर्वात आव्हानात्मक होते.
हा पूल बांधणे इंजीनियर्ससाठी मोठे आव्हान होते. ज्या भागात हा पूल बांधण्यात आला आहे तिथे खोल दर्या, डोंगर, नदी आहे. येथे मोठया प्रमाणावर पाऊस पडतो. या टप्प्यात एकूण १५ व्हॅली पूल आहेत. या पुलांची एकूण लांबी ११ किलोमीटर आहे. त्यापैकी पॅकेज १६ मध्ये उभारण्यात आलेला सर्वाधिक लांबीचा व्हॅली पूल आहे. २.२८ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. पॅकेज १५ मध्ये खोल दरी असल्यामुळे पुलाच्या खांबाची उंची ८४ मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच २८ ते ३० मजली इमारत इतकी. यासह शेवटच्या टप्प्यात ६ छोटे पूल देखील बांधण्यात आले आहे. काही ठिकाणी खडकात ३० ते ४० मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या पुलावरून खाली पाहिले तर चक्करच येईल.
सर्वाधिक रूंदीचा बोगदा
चौथ्या टप्प्यातला मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्हयांना जोडतो. सहयाद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. इगतपुरी येथील ८ किलोमीटरचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे तर देशातील सर्वाधिक रूंदीचा हा बोगदा आहे. या बोगद्याची रूंदी १७.६१ मीटर इतकी आहे. तर बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे.









