मुंबई । महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण तापलेलं असून, या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एकत्रित मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, हिंदी सक्तीविरोधात स्वतंत्रपणे न लढता एकत्र येण्यावर मनसेचा भर होता.
या प्रस्तावावर आता शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, दोन्ही पक्ष हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी ’एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घडामोडींवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, राजकारणात कोण कधी कोणाशी युती होईल याचा नेम नसतो. दोन्ही पवार, दोन्ही ठाकरे एकत्र यावे असं अनेकांना वाटतं, पण ते घडेलच असं नाही.
मराठीच्या प्रश्नावर एकत्र लढा देण्याला त्यांनी पाठिंबा दिला असून, “शिवसेना मूळत: मराठी माणसाच्या हक्कांसाठी स्थापन झाली होती. मराठी युवकांना नोकरी, व्यवसाय, आणि इतर संधी मिळाव्यात यासाठी ही चळवळ उभी राहिली होती, असं ते म्हणाले.
तसंच, मराठीसाठी एकत्र येणं गैर नाही. जर त्या दिशेने पाऊल टाकलं असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. मात्र, मुख्यमंत्री आधीच स्पष्टपणे सांगितलं आहे की, या विषयावर सर्व संबंधितांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल,” असे भुजबळ यांनी नमूद केले.









