नाशिक । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या राज्यस्तरीय शिबीरासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीची निवड केली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे इगतपुरीत आगमन झाले. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आली असून या शिबीराच्या माध्यमातून शिवसेनेसोबत युतीबाबत निर्णय होणार का?, राज ठाकरे पदाधिकार्यांना काय कानमंत्र देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून नाशिकने सातत्याने मनसेला पाठिंबा दिला आहे. २००७ च्या महापालिका निवडणुकीत नाशिकने मनसेला घवघवीत यश मिळवून दिले होते. ४० नगरसेवकांसह याच शहरातून पक्षाला पहिला महापौर देखील मिळाला होता.
राजकीय इतिहास पाहता, नाशिकने मनसेला २००९ मध्ये तीन आमदार दिले. वसंत गीते, नितीन भोसले, दिवंगत आ.उत्तमराव ढिकले हे मनसेचे आमदार निवडून आले.२००९ मध्ये मनसेचे पहिली लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याविरोधात हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेने दुसर्या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला मागे टाकले.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर मनसेची पडझड व्हायला सुरूवात झाली. २०१७ च्या महापालिका निवडणूकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या ४० वरून पाचवर आली सद्यस्थितीत मनसेनेचा एकच माजी नगरसेवक आहे.
अलिकडच्या काळात मनसेने हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मनसेच्या आक्रमकतेमुळे राज्य सरकारला सदरचा निर्णय मागे घ्यावा लागला. याच दरम्यान भाषेच्या मुद्यावरून राज उध्दव ठाकरे एकत्र आल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेसोबत संभाव्य युतीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, या अधिवेशनातून काही स्पष्ट संकेत मिळतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मनसेच्या या शिबीराकडे लागून आहे.








