नाशिक । राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा झडत असतांना नाशिकमध्ये मात्र ठाकरे गटाच्या दोन्ही गटाचे मनोमिलन झाले. मनसेच्या वास्तूशांतीच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी मनसे कार्यालयात हजेरी लावली. त्यामुळे नेते एकत्र येवो न येवोत नाशकात मात्र मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे मनोमिलन घडून आल्याचे दिसून आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. आदित्य ठाकरे यांनीही याबाबत प्रतिसाद दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुत्र अमित यांनीही एकत्र येण्यास काही हरकत नसल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे बंधु काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आता कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. नाशिकमध्ये तर यापूर्वीच ठाकरे गटाकडून होल्डिंग झळकवण्यात आले होते. गुरूवारी तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी थेट मनसेच्या कार्यालयात दाखल झाले. मनसेच्या ठक्कर बझार येथील कार्यालयाच्या नुतनीकरणानिमित्त वास्तूशांतीचे आयोजन करण्यात आले होते.
या पूजेनिमित्त ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी मनसे कार्यालयात भेट दिली. यावेळी ठाकरे गटाने एक फोटो आणला होता त्यामध्ये हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र असा उल्लेख होता. या फोटोवर राज आणि उध्दव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता.
मराठी माणसांसाठी दोन्ही ठाकरे नेत्यांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य आणि कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मतही यावेळी दोन्ही गटाने व्यक्त केले. यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सलिम शेख, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी.जी.सुर्यवंशी, दत्ता गायकवाड, बंटी कोरडे, बाळा दराडे, अॅड. नितीन पंडीत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला वाटते की दोघांनी एकत्र यावे.याचा निर्णय वरिष्ठ घेतील पण एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचे चित्र निश्चितपणे बदलेल.आम्हाला मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी वास्तूशांती पूजेचे निमंत्रण दिले होते. निर्णय महाराष्ट्राचा आहे आमचे नेते हा निर्णय घेतील.
दत्ता गायकवाड, नेते ठाकरे गट
राज ठाकरे कधीच व्देष करत नाही. ठाकरे गटाचे मी मनसे कार्यालयात स्वागत करतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर सत्ताधार्यांना पळता भुई थोडी होईल. त्यांनी एकत्र यावे ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. मराठी माणसाला न्याय देणारे हे दोघे नेते आहेत.
दिनकर पाटील, सरचिटणीस, मनसे









