नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना युतीबाबत चर्चा झडू लागल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. त्यातच मुंबईतील विजयी मेळाव्यानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने चर्चेला अधिकच जोर आला. मात्र, इगतपुरी येथे पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. युतीबाबत “नोव्हेंबर-डिसेंबरनंतर पाहू” असे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे युतीबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय शिबिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आयोजित करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिरात राज ठाकरे काय भूमिका घेतात, आगामी निवडणूक रणनिती कशी असेल, याबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहे. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र दिसले. ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील युतीचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी कोणतेही जाहीर भाष्य केलेले नव्हते.
शिवसेनेसोबतच्या युतीबाबत पक्षातील नेते, पदाधिकारी यांना “आपली परवानगी असल्याशिवाय बोलू नये” असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यामुळे युतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. त्यातच युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, “आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्यानेच लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू”, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेना–मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा झडू लागल्या आहेत.
सोमवारी इगतपुरी येथे आयोजित पक्षाच्या शिबिरानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता; त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही.”
शिवसेनेसोबत जाणार का, याबाबत विचारले असता, “याबाबत नोव्हेंबर–डिसेंबरनंतर बघू,” अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आता युतीबाबत सस्पेन्स अधिकच वाढला आहे.











